Sunday, 12 January 2025

ध्यान (मेडीटेशन) आणि त्याचे फायदे...

निरनिराळ्या व्यवसायातील व्यक्तींच्या दिनक्रमाचा विचार केल्यास असे आढळते कि त्यांच्या कामाचे स्वरूप जरी वेगळे असले, काम करण्याची क्षमता जरी वेगळी असली तरीही निद्रा अथवा झोप हि सर्वाना सारखीच आवश्यक असते. फरक फारतर कोणाला कमी अथवा ज्यास्त झोपेची गरज असते इतकाच होईल. हा सर्वमान्य नियम सुद्धा शास्त्रज्ञांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केला आहे. निद्रा हा ग्लानी मधून गाढ झोपेची पायरी गाठणे व कालांतराने जागृतावस्थेत येणे एवढाच साधा सरळ प्रकार नसून त्यात निश्चित अशा ४ पायऱ्या दाखविता येतात. खास इलेक्ट्रोड्सच्या सहाय्याने पापण्यांखाली होणारी जलद हालचाल (Rapid Eye Movement, REM) संथ हालचालींपेक्षा वेगळी अशी (non-REM) दाखविता येते. REM स्तरावरील झोपेतून जागे केले तर त्या वेळी त्या व्यक्तीस स्वप्न पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच स्वप्ने सर्वांनाच पडतात पण सर्वांच्या लक्षात रहात नाहीत असे म्हणता येईल. झोपेचे प्रमाण काही काळ कमी झाल्यास नंतरच्या झोपेत REM झोपेचे प्रमाण वाढते. REM झोपेत असताना सातत्याने उठवून एखाद्या व्यक्तीची झोप कमी केल्यास ती व्यक्ती चिडचिडी होते व गोंधळलेली असते आणि हि स्थिती निद्रा पूर्ववत होई पर्यंत राहते हे सुद्धा प्रयोगांती सिद्ध झाले आहे.

अपूर्ण निद्रा आणि मानसिक तणाव
म्हणजेच दिवसभराच्या श्रमाचे परिमार्जन करण्यासाठी निद्रा आणि मानसिक संतुलना व स्थिरतेसाठी निद्रा व त्यातील स्वप्ने आवश्यक आहेत. परंतु कित्येक व्यक्तींना त्यांच्या स्वभावामुळे अथवा कामाच्या प्रकारामुळे पडणाऱ्या ताणाचा, निव्वळ झोपेमुळे निचरा होऊ शकत नाही. मानसिक तणावामुळे झोप येत नाही आणि अपूर्ण झोपेमुळे तणाव वाढतो असे हे रहाटगाडगे चालूच राहते व त्याचा परिणाम प्रकृती बिघडण्यात होतो. जागृतावस्था, निद्रा आणि निद्रेतील स्वप्न पडणारा काळ या व्यतिरिक्त मानसिक तणाव कमी करणारा ४था प्रकार कोणता या प्रश्नाचे उत्तर म्हणून शास्त्रज्ञांनी ध्यान अथवा मेडीटेशन कडे बोट दाखवले आहे.

मेडीटेशन किती वेळ करावे
वैद्यकीयशाखेच्या विद्यार्थ्यांसमोर Transcendental Meditation (TM) वर भाषण करीत असताना एका विद्यार्थ्याच्या ‘आमची व्यवसायाची सुरवात झाल्यावर आम्हास रोजची १५ मिनिटे मेडीटेशनसाठी देण्यास वेळ कुठून असणार’ या खोचक प्रश्नाचे स्वामी महेश योगी यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. स्वामी म्हणाले कि धनुष्याला बाण लावल्यावर प्रत्यंच्या जी मागे खेचली जाते ती तो बाण ज्यास्तीत ज्यास्त पुढे पाठविण्यासाठी. त्याच प्रमाणे TM साठी दिलेली रोजची १० ते १५ मिनिटे आपणास ज्यास्त कार्यक्षम बनवतील.

मेडीटेशन केल्याने होणारे फायदे
मेडीटेशन करण्यासाठी आपणास बैठकीची सहज स्थीती धारण करता आली पाहिजे. ‘स्थिर सुखमासनम’ म्हटल्यावर भगवान पतंजली यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी रहाते व योगाभ्यास नजरेसमोर उभा राहतो. प्रत्येक आसनात भेदात्मक शिथीलतेचे (Differential Relaxation) तंत्र आत्मसात केल्यामुळे अंशात्मक मेडीटेशन होतेच. परंतु ‘आम्ही नियमित मेडीटेशन करतो’ असे सांगणाऱ्या व्यक्ती क्वचितच भेटतात. मेडीटेशन केल्याने फायदा होतो हे निर्विवाद सत्य आहे. मेडीटेशन केल्याने मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांची छाननी शास्त्रोक्त पदधतीने, आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने झाली आहे. उदाहरणार्थ नियमित ध्यान करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाची स्पंदने, रक्तदाब, श्वासाची गती आणि लय, मेटाबोलिक रेट इत्यादी मेडीटेशन न करणाऱ्यापेक्ष्या कमी असतात. अश्या प्रकारच्या संशोधनावर आधारीत निबंध ‘लांसेट’ व ‘सायंटीफिक अमेरिकन’ या सारख्या दर्जेदार शास्त्रीय संशोधन प्रसिद्ध करणाऱ्या मासिकात प्रसिद्ध झाला आहे. सध्या मेडीटेशन वर खूप संशोधन सुद्धा चालू आहे.

अर्थात अश्या प्रकारच्या बदलामुळे आपला काय फायदा होतो हा प्रश्न येतोच. मेडीटेशन पासून मिळणारे फायदे अनेक आहेत. मेडीटेशनचा अभ्यास नियमित केल्यास अशी व्यक्ती मानसिक दृष्ट्या अधिक सक्षम होते व त्यामुळे सिगारेट व दारू या सारख्या व्यसनापासून मुक्ती मिळण्यास मदत होते अथवा या व्यसनांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. मानसिक तणाव कमी झाल्यामुळे मनोकायिक रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. अस्थमा, अल्सर यासारख्या व्याधींवर मेडीटेशनचा सुपरिणाम पहावयास मिळतो.

विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्ती सुधारते व त्यामुळे अभ्यासातील गती वाढते. विषयाचे नीट आकलन झाल्यामुळे वरिष्ठ अधिकारी व्यक्तींच्या नोकरीतील कामाचा दर्जा उंचावतो आणि काम समाधानपूर्वक होते असे पाहण्यात आले आहे. या सर्व गोष्टी तौलनिक दृष्टीने अभ्यास करून गणिती (Statistics) पद्धतीने सिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मेडीटेशन म्हणजे काय व ते कसे केले जाते ते आपण पुढे पाहू.

No comments:

Post a Comment

ध्यान (मेडीटेशन) आणि त्याचे फायदे...

निरनिराळ्या व्यवसायातील व्यक्तींच्या दिनक्रमाचा विचार केल्यास असे आढळते कि त्यांच्या कामाचे स्वरूप जरी वेगळे असले, काम करण्याची क्षमता ज...

Popular Posts