Tuesday 21 January 2020

शिवसमर्थ भेटीचे प्रेरणास्थान : संत तुकाराम

शिवसमर्थ भेटीचे प्रेरणास्थान : संत तुकाराम

१६४५ साली शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला भगवान शंकराच्या साक्षीने प्रारंभ केला. १६४८ सालापर्यंत महाराजांनी बरीच मुसंडी मारली व आदिलशाही मुलुखातले अनेक किल्ले जिंकून स्वराज्याला जोडले. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आदिलशाहीत नोकरीला होते. एकेकाळचे आदिलशाहीतील त्यांचे मित्र बाजी घोरपडे व दियानात राव देशपांडे आता शहाजीचे शत्रू झाले होते. " शहाजी आपल्या पोराला फूस लावून नवे साम्राज्य निर्माण करतो आहे " अशी तक्रार या दोघांनी आदिलशहाजवळ केली व आदिलशहाने त्यांच्यावर शहजीस अटक करण्याची कामगिरी सोपवली. अफजुलखानाच्या मदतीने त्या दोघांनी शहाजी महाराजांना पकडले व आदिलशहाच्या ताब्यात दिले. शिवाजी महाराजांच्या बंडखोरीबद्दल आदिलशहाने त्यांना जाब विचारला. परंतु शहाजी महाराजांनी “ मुलगा माझे ऐकत नाही ” असे सांगून उपरणे झटकले. परंतु शहजींच्या उत्तराने आदिलशहाचे समाधान नाही झाले. त्यांनी शहाजी महाराजांना तुरुंगात टाकले व शिवाजीस पत्र टाकून विचारले, “ बोला, काय हवंय तुम्हाला ? हिंदवी स्वराज्य की आईचं सौभाग्य ? ”

या पत्रामुळे शवाजी महाराजांच्या सर्व राजकीय हालचाली एकदम ठप्प झाल्या. कारण सुलतानानं जिजाबाई लहान असताना त्यांचे वडील, काका व दोन भाऊ एकाच वेळी मारेकर्‍यांकडून मारले होते. या इस्लाम राज्यकर्त्यांचे क्रौर्य शिवाजी महाराज पुरेपूर जाणून होते. त्यांनी आपल्या कार्याला भगवंताचे अधिष्ठान असावे म्हणून संत तुकाराम महाराजांची भेट घ्यायचे ठरवले. ही घटना १६४८ सालच्या जून महिन्यात घडली व १६५० सालच्या जानेवारी महिन्यात संत तुकाराम महाराजांनी देह ठेवला. संत तुकाराम महाराजांचा पिंड मुळातच भाक्तीप्रवण होता. त्यांचा काळ निवृत्तीकडे होता. शिवाय आपला अंत:काल जवळ आल्याची त्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांनी " समर्थ रामदासांची " कास धरावी अशी प्रेमाची सूचना त्यांनी शिवाजी महाराजांना केली. त्या वेळी समर्थांचे नाव महाराजांनी प्रथमच ऐकले. समर्थ कुठे राहतात, काय करतात, त्यांचा पोशाख कसा असतो असे विचारले तेव्हा संत तुकाराम महाराजांनी त्यांना " समर्थांचे " विस्तृत वर्णन सांगितले. तुकाराम महाराजांचे दोन अभंग असून पहिल्या अभंगात त्यांनी शिवाजी महाराजांना समर्थांचा अनुग्रह घेण्याचा सल्ला दिला आहे, तर दुसर्‍या अभंगात समर्थांचे वर्णन केले
आहे. हे दोन्ही अभंग मुद्दाम पुढे देत आहे.

संत तुकाराम महाराजांचा पहिला अभंग :-

राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥

संत तुकाराम ...

संत तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग :-

हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा
रामदासी बाणा या रंगाचा ।
पीतवर्ण कांती तेज अघटित
आवाळू शोभत भृकुटी माजी ॥ १ ॥

काष्टांच्या पादुका स्वामींच्या पायात
स्मरणी हातात तुळशीची ।
रामनाम मुद्रा द्वादश हे केले
पुच्छ कळवळी कटी माजी ॥ २ ॥

कौपिन परिधान मेखला खांद्यावरी
तुंबा कुबडी करी समर्थाच्या ।
कृष्णातटा काठी जाहले दर्शन
वंदिले चरण तुका म्हणे ॥ ३ ॥

संत तुकाराम ...




संत तुकाराम महाराजांनी सांगितल्यावर समर्थांच्या दर्शनाची शिवछत्रपतींना ओढ लागली होतीच. ते चाफळ जाऊन समर्थांना भेटणार होतेच. पण योगायोगाने त्यांचा मुक्काम वाईला होता. वाईमधील समर्थशिष्यांकडून ही बातमी चाफळला पोचली. मघाशी वर्णन केल्याप्रमाणे समर्थांनी शिवाजी महाराजांना पत्र पाठवले व शिवसमर्थ भेट झाली. या चरित्रात संत तुकाराम महाराजांचा उल्लेख समर्थांच्या एवढा येत नाही. याचे कारण संत तुकाराम महाराज फार लवकर सदेह वैकुंठाला गेले. त्या वेळी शाहिस्तेखानाचा पराभव या महत्वाच्या घटना तुकाराम महाराजान्नाच्या निर्याणानंतर ९-१० वर्षांनी घडल्या. याउलट समर्थ शिवाजी महाराजांच्या निर्याणानंतर पावणेदोन वर्षांनी समाधिस्त झाले. त्यामुळे संपूर्ण शिवचरित्राचे ते साक्षीदार बनले. १६५७ साली प्रतापगडावर छत्रपतींनी तुळजाभवानीची स्थापना केली तेव्हा समर्थांनी या देवीला साकडे घातले –


“ दुष्ट संव्हारिले मागे । ऐसे उदंड ऐकितो ।
परंतु रोकडे काही । मूळ सामर्थ्य दाखवी ॥
तुझा तू वाढवी राजा । शीघ्र आम्हाचि देखता ।
मागणे एकची आता । द्यावे ते मज कारणे ॥
रामदास म्हणे माझे । सर्व सातुर बोलणे ।
क्षमावे तुळ्जे माते । इच्छा पूर्णचि तू करी ॥ ”

शिवाजी महाराजांच्या हातात सत्ता यावी व त्यांच्या मस्तकावर हिंदवी स्वराज्याचे छत्र झळकावे याची समर्थांना किती ओढ लागली होती ते या प्रार्थनेत दिसून येते.
पुण्याच्या समर्थ व्यासपीठाच्या एका समारंभात प. पू. बाबा महाराज सातारकर म्हणाले,
तुकाराम आणि समर्थ रामदास हे शिवछत्रपतींचे दोन डोळे होते ही गोष्ट कधी नाकारता येणार नाही. "



जय जय रघुवीर समर्थ !!! 

https://www.youtube.com/watch?v=PMalL0b6T8Q&feature=youtu.be&fbclid=IwAR2NZng4eq134O1dQWY6RG3pHabUqgh6U_RHNV8EHFFL8-aLD3dlvUACMiI

No comments:

Post a Comment

We Are Hiring RN- Medical Surgeon | Location : New York (USA)

We Are Hiring RN- Medical Surgeon Assessing, planning, implementing, and evaluating patient care plans in consultation with healthcare prof...

Popular Posts