Tuesday 30 October 2018

संत तुकाराम महाराज अवतार आणि कार्य

२५ मार्चला तुकाराम बीज. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि महाराजांचे विविध युगात असलेले अवतार आणि कार्य व तुकाराम बीज दिवशी झालेले चौथे स्वर्गारोहण याविषयी थोडक्यात आढावा घेणारा लेख.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आज जगाच्या कानाकोप-यात प्रत्येकाला माहीत असतील; परंतु महाराजांच्या विविध अवतारकार्यामुळेच ते तुकाराम झाले हे काहीच लोकांना माहीत असेल. तुकाराम कोणाचे अवतार, त्यांनी मनुष्यदेहाचे सार्थक कसे केले असे नानाविध प्रश्न आपल्या मनात असतीलच.

तुकारामांचे अवतार
पुराण कथेनुसार तुकाराम महाराजांचा पृथ्वीतलावरील अवतार म्हणजे सत्ययुगातील अंबऋषी. अंबऋषी या अवताराबद्दल सांगायचे म्हणाल तर अंबऋषीस्वरूप तुकोबाराय प्रथमत: दुर्वासऋषींचे शिष्य होते. गुरू-शिष्यांमध्ये थोडय़ा प्रमाणात कलह झाला. दोघांनीही शक्तिप्रदर्शन केले. दुर्वासऋषींनी अंबऋषींवर सुदर्शन चक्र सोडले. यातून पळ काढत अंबऋषी ब्रह्मलोकांत पोहोचले; पण सुदर्शन चक्राने त्यांचा पाठलाग सोडला नाही. शेवटी ते वैकुंठात गेले. भगवान विष्णूंची शरणागती पत्करली. त्यांनी अंबऋषींना दुर्वासांना शरण जा, असे सांगितले. यानंतर दुर्वासऋषींनी सुदर्शन चक्र रोखले, मात्र तुला प्रत्येक अवतारकार्यात गर्भवास सोसावा लागेल, असा शापही दिला.
। अंबऋषी कारणे गर्भवास सोसीसी।
महाराजांना गर्भवास सोसावा लागला या गर्भवासात महाराजांनी देवाकडे एक मागणी केली होती तो अभंग ।तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हासी।
देवांने यावर प्रश्न विचारला की, महाराज सुख कशात आहे, याचे उत्तर देणारा हा अभंग
। सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती।
। रखुमाईच्या पती सोयरिया।
। गोड तुझे रूप गोड तुझे नाम।
। देई मज प्रेम सर्वकाळ।
। तुका म्हणे काही न मागो आणिक।
। तुझे पायी सुख सर्व आहे।
महाराजांचे चार युगांप्रमाणे अवतार, पहिल्या अवतारात म्हणजेच कृतयुगात तुकोबाराय प्रल्हादस्वरूप होते. या अवतारात त्यांचे आराध्य दैवत श्री भगवान विष्णू होते. दुस-या अवतारात त्रेतायुगात तुकोबाराय अंगदस्वरूप होते. तर तिस-या अवतारात द्वापारयुगात तुकाराम महाराज उद्धव स्वरूप होते. कलियुगात चौथ्या अवतारात ते नामदेवराव होते. तर पाचवा अवतार हा तुकाराम नावाने जगात प्रसिद्ध झाला आहे. याची साक्ष देणारा अभंग
। जे जे झाले अवतार। तुका त्यांचे बरोबर।
सत्ययुग : अंबऋषी, गुरू : दुर्वासऋषी आणि आराध्य : विष्णू
कृतयुग : प्रल्हाद, गुरू आणि आराध्य : भगवान विष्णू
त्रेतायुग : अंगद, गुरू आणि आराध्य : राम
द्वापारयुग : उद्धव, गुरू आणि आराध्य : भगवान कृष्ण
कलियुग : नामदेव, गुरू : येसोबा खेचर, आराध्य : भगवान परमात्मा पांडुरंग
कलियुग : तुकाराम, गुरू : बाबाजी चैतन्य आणि
आराध्य : भगवान परमात्मा पांडुरंग
तुकाराम महाराजांचा परिवार आणि शिष्यगण
तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव तुकाराम वोल्होबा आंबिले (मोरे). तुकोबा मूळचे देहू गावचे स्थायिक होते. कुटुंबात आई कणकाई, वडील वोल्होबा मोरे, थोरला भाऊ सावजी आणि धाकला भाऊ कान्होबा असा परिवार होता. महाराजांची पहिली पत्नी रखमाबाई आणि दुसरी जिजाबाई ऊर्फ अवली. महाराज आणि रखमाबाई यांचा पहिला पुत्र संतू. यानंतर अवली हिची मुले पहिली मुलगी गंगा, दुसरा व तिसरा मुलगा भोळ्या आणि विठू,चौथी मुलगी भागीरथी.
महाराजांचे आराध्य दैवत विठोबा. महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य. महाराजांचे शिष्य नाहुजी आणि बहेनाबाई शिऊरकर. स्वर्गारोहणानंतरचे महाराजांचे शिष्य निळोबाराय व कान्होबाराय. तुकाराम महाराज हे नामदेवांचे अवतारकार्य पूर्ण करण्यास आले होते याची साक्ष देणारा अभंग
। प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी।
। उरले ते शेवटी लावी तुका।
याबरोबरच महाराज कणकाईच्या पोटीच का जन्माला आले याची ग्वाही देणारा अभंग
। अभंग राहिले चार कोटी।
। म्हणून तुका कणकाईच्या पोटी।
 तुकाराम महाराजांना काव्य स्फुरण
तुकाराम महाराज मुळात विठ्ठल भक्त असल्यामुळे त्यांना अभंगाचा सहवास लहानपणीच मिळाला होता. वारक-यांच्या मुखातून उच्चारलेल्या अभंगाचा महाराज विचार करायचे. अभंगात काय वज्र्य करायचे आहे आणि कसे संसार सागरातून तरून जायचे आहे याचा विचार ते करायचे. दरम्यान त्यांनी एकांत स्वीकारला. एकांतात स्वत:चा शोध लागल्यानंतर भगवान परमात्मा पांडुरंग आणि संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांनी तुकारामांना स्वप्नात दृष्टांत दिला. समाजाला दिशा देण्याचे काम तुझ्या लेखणीतून होणार आहे, असे श्री विठ्ठल आणि नामदेवांनी सांगितले. त्याची साक्ष देणारा हा अभंग.
। नामदेवे केले स्वप्नामाजी जागे। सवे पांडुरंगे येऊनियां।
। सांगितले काम करावे कवित्व।वाउगें निमित्य बोलो नको।
। माप टाकी सळे धरिली विठ्ठले। थापटोनी केले सावधान।
तुकाराम महाराजांचे संसाराविषयी मत
तुकाराम महाराजांच्या लेखी संसार हा शून्यात जमा असला तरी महाराज उपदेश करताना सांगतात की, लोकहो प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रपंच नसला तर परमार्थ होत नाही आणि परमार्थ नसला तर प्रपंच नीट करता येत नाही, त्यामुळे महाराज एका ठिकाणी सांगतात,
। प्रपंच करोनी परमार्थ साधावा।
। वाचे आळवावा पांडुरंग।
महाराज म्हणतात, ज्या व्यक्तीच्या लेखी संसाराला नगण्य किंमत आहे आणि जो हरिभक्तीचा आसुसलेला आहे. त्याच्या संसारात कधीच व्यथा येणार नाहीत.
। संसाराच्या नावे घालुनिया शून्य। वाढता हा पुण्य धर्म।
। हरिभजनें हे धवळिले जग। चुकविला लाग कळिकाळाचा।
। तुका म्हणे सुख समाधि हरिकथा। नेणे भवव्यथा गाईल तो।
तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, संसार म्हणजे एक प्रकारचे व्यसनच आहे. व्यसनाधीन लोकांना हरिची व्याप्ती कळत नसते. जे संसार करत बसतात, हरिला भजत नाहीत त्याचे ब्रह्मांडात अखंड वास्तव्य राहात नाही. जे संसारात विलीन असतात त्यांना नाम कळतही नाही आणिपचतही नाही, असा आशय सांगणारा अभंग
। संसाराच्या अंगी अवघीच व्यसने। आम्ही या कीर्तने शुद्ध झालो।
। आता हे सोवळे झाले त्रिभुवन। विषम धोऊन सांडियेले।
। ब्रह्मपुरी वास करणे अखंड। न देखिजे तोंड विटाळाचे।
। तुका म्हणे आम्हा एकांताचा वास। ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा।
महाराजांचा जिजाबाईस उपदेश
महाराजांची दुसरी पत्नी जिजाबाई ऊर्फ अवली. जिजाबाईची श्रद्धा लहानपणापासून भगवान कृष्णावर होती. भगवान पांडुरंगाबद्दल त्यांच्या मनात अतिशय ईर्षा होती. महाराजांना कवित्व सुचल्यानंतर महाराज पांडुरंगाचे गुण गाऊ लागले. वारीला जाऊ लागले आणि भजन-कीर्तनात रंगू लागले. महाराजांच्या या स्वभावाचा अवली एका अभंगात तिरस्कार करते..
। तुकोबाची कांता सांगे लोकापाशी।
। जातो पंढरीसी स्वामी माझा।
। फुटकाच वीणा त्याला दोन तारा।
। घाली येरझारा पंढरीसी।
महाराजांच्या पत्नी म्हणतात, अहो माझ्या दादल्याला त्या पंढरीच्या भुताचे वेड लागले आहे. आषाढी, कार्तिकी एकादशीला माझा पती संसार वा-यावर सोडून पंढरपुरी जातो. त्याचा वीणा तुटला आहे याचेही त्याला भान नाही. फक्त पंढरपुराला येरझारा तो घालत आहे.
। माझ्या चौघी बहिणी नांदती सुखात।
। ऐसी कैसी माझी कर्मरेषा।
जिजाई म्हणतात, माझ्या चौघी बहिणी अगदी सुखाने नांदत आहेत. पण माझ्याच पदरात तुकोबासारखा देववेडा दादला का दिला. माझी कर्मरेषाच वाईट आहे. आमच्या घरात खायला अन्न नाही, मुलं बाळं उपाशी आहेत; पण माझ्या नव-याला याचं काहीही नाही.
। माझे मायबापे बरे नाही केले।
। पदरी बांधिले भिका-याच्या।
जिजाई या चरणात त्यांच्या आई-वडिलांना बोल लावतात. त्या म्हणतात, माझ्या आई-वडिलांना माझ्यासोबत हे योग्य केले नाही. त्यांनी उगाचच मला तुकोबासारख्या भिका-याची पत्नी बनवलं आहे.
। तुका म्हणे कांते ऐसे ना बोलावे।
। शरणसी जावे विठ्ठलासी।
यावर महाराज म्हणतात, जिजाई असं वाईट बोलू नकोस. यापेक्षा तू भगवान विठ्ठलाला शरण जा.
 तुकाराम महाराजांवर सद्गुरुकृपा
तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी महाराजांना बीजमंत्र दिला. त्यांच्या कृपाशीर्वादाने महाराजांना ज्ञान प्राप्त झाले.
। माझिये मनीचा जाणोनिया भाव। तो करी उपाव गुरूरावो।
। आवडीचा मंत्र सांगितला सोपा। जेणे नोहे गुंफा कोठे काही।
 महाराजांना वैराग्यप्राप्ती कशी झाली..?
तुकाराम महाराजांना साधुसंतानी विचारले, महाराज तुम्हाला वैराग्यप्राप्ती कशी झाली. यावर महाराज म्हणतात, अहो मला वैराग्यप्राप्ती झाली नाही, माझ्या विठूरायाने ती घडवून आणली. काय माझे होते जे मी गमावले, ज्यामुळे मला वैराग्य प्राप्त होईल. दुष्काळात माझी एक पत्नी अन्न अन्न करून मेली. होते नव्हते ते द्रव्य गेले, मग माझ्याकडे देवभक्तीशिवाय पर्यायच राहिला नाही. देवाला ही दुष्काळात नैवेद्य मिळत नव्हता म्हणून वाटलं भक्ती करावी. आरंभी एकादशीला कीर्तन करत होतो. पण अभ्यासात चित्त नव्हते. मी संसाराधीन होतो. संतांची पदं पाठ करून मी कीर्तन करायचो. मग सद्गुरूंनी कृपा केली. त्यांच्या वचनाने मला वैराग्य प्राप्त झाले, अशी ग्वाही महाराज एका अभंगात देतात.
। दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान। स्त्री एकी अन्न अन्न करता मेली।
। देवाचे देऊळ होते जे भंगले। चित्तासी ते आले करावेसे।
। आरंभी कीर्तन करी एकादशी। नव्हते अभ्यासी चित्त आधी।
। काही पाठ केली संतांची उत्तरे। विश्वास आदर करोनिया।
। मानियेला स्वप्नी गुरूचा उपदेश। धरिला विश्वास दृढ मनी।
महाराज म्हणतात, या संसारात मी खूप त्रासलो होतो. धनामागे पळण्याची आस मेली होती; त्यामुळे मी धन याचकांना दिले. प्रिय व्यक्तींचा सहवास सोडला आणि मी करंटा झालो. लोकांपासून दूर राहण्यासाठी मी रानावनांत एकांत शोधला.

इंद्रायणीच्या उदकातून महाराजांच्या वह्या तरल्या
इंद्रायणीच्या उदकात महाराजांचे अभंग तेरा दिवस तरले, यावर महाराजांनी देवाची केलेली स्तुती आणि क्षमायाचना. महाराजांवर आजवर भरपूर संकटं आली होती. महाराजांनी त्याला तोंडही दिले होते. मात्र, त्यांच्या कवित्वावर शंका घेत काही ब्राह्मणांनी त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले. यावेळी महाराजांनी पंढरीरायास साकडे घातले. तेरा दिवस अन्न-पाणी सोडले. महाराजांनी देवाला सांगितले, हे भगवान आता ही तुझी परीक्षा आहे, असा आशय सांगणारा अभंग.
। थोर अन्याय केला। तुझा अंत म्या पाहिला।
। जनाचिया बोला। साठी चित्त क्षोभिवले।
। भागविलासी केला सीण। अधम मी यातीहीन।
। झाकूनि लोचन। तेरा दिवस राहिलो।
। अवघे घालूनिया कोडे। तहानभुकेचे साकडे।
। योगक्षेम पुढे। करणे लागले।
। उदकी राखिले कागद। चुकविला जनवाद।
। तुका म्हणे ब्रीद। साच केले आपुले।
महाराज म्हणतात, भगवंता माझ्या वह्या तू इंद्रायणीतून काढून तुझे ब्रीद सत्य केलेस आणि लोकांना खोटे पाडलेस.
तुकाराम महाराजांचे उदकावर तरल्यानंतर रामेश्वर भट्ट यांनी याचे वर्णन केलेला अभंग..
 जळी दगडासहित वह्या। तारियल्या जैशा लाह्या।
। म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा। तुका विष्णू नाही दुजा।
महाराजांचे स्वर्गारोहण
काही कथांमध्ये महाराजांचे चार वेळा स्वर्गारोहण झाल्याचे सांगितले जाते. याप्रमाणे महाराजांचे प्रथम स्वर्गारोहण झाल्यावर ते संताजी जगदाळे या वारक-यास टाळ दिंडी देण्यासाठी पुन्हा भूतलावर आले होते. यानंतर दुस-या स्वर्गारोहणात बारा अभंग लिहण्यासाठी पुन्हा भूतलावर आले. तिसरे स्वर्गारोहण झाले तेव्हा शिष्य निळोबाराय आणि कान्होबाराय यांना उपदेश करण्यासाठी पुन्हा देहूत अवतरले. कान्होबारायांनी देवाबरोबर भांडण करत असताना महाराजांना परत आणा नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही अशा शब्दात धमकीच दिली होती.
। धिंद धिंद तुझ्या करीन चिंधडय़ा।
। दे माझ्या भावा आणोनिया।
यानंतर महाराजांचे चौथ्यांदा प्रयाण झाले. चौथ्या प्रयाणानंतर ते भागीरथीसाठी पुन्हा देहूगावी आले होते. महाराजांचे चौथे स्वर्गारोहण हे शेवटचे स्वर्गारोहण होते. चौथ्या प्रयाणाच्या वेळी महाराज लोकांना सांगत जात होते. बाबांनो मी चाललोय, कृपा असू द्या तुमची. माझी विनंती सगळ्या लोकांना सांगा.. शेवटच्या कीर्तनाला म्हणजे फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीयेला महाराजांचे स्वर्गारोहण झाले. दुपारी १२ वाजता महाराज वैकुंठाला गेले. ही वार्ता भागीरथीला कळाली यानंतर तिने तुकाराम नामाचा जप केला म्हणून महाराज चौथ्यांदा पृथ्वीवर आले होते.
। आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी।
सकळां सांगावी विनंती माझी।
महाराज वारक-यांना संबोधतात की, आता तुम्ही पंढरीरायाला बोलवा
। तुम्ही सनकादिक संत। म्हणविता कृपावंत।
। एवढा करा उपकार। सांगा देवा नमस्कार।
। भाकावी करूणा। विनवा पंढरीचा राणा।
महाराजांच्या नावाने यमाचाही थरकाप उडतो. त्यामुळे आजच्या दिवशी त्याचा गजर केला पाहिजे.। तुकाराम तुकाराम । नाम घेता कापे यम।तुकाराम. तुकाराम.. बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम..
तुकारामांच्या अवताराबद्दल या प्रतिमा पाहा…  
                                                         त्रेतायुगातील अंगदस्वरूप तुकोबाराय 
                                              कृतयुगात प्रल्हादस्वरूप तुकोबाराय 
                                                     द्वापारयुगात उद्धवस्वरूप तुकोबाराय
                                             कलियुगात नामदेवस्वरूप तुकोबाराय 
                                                        जगद्गुरु संतशिरोमणी श्री  तुकोबाराय

We Are Hiring RN- Medical Surgeon | Location : New York (USA)

We Are Hiring RN- Medical Surgeon Assessing, planning, implementing, and evaluating patient care plans in consultation with healthcare prof...

Popular Posts